एकमेव मराठी शैक्षणिक वेबसाईट

अहिल्याबाई होळकर मुलींसाठी मोफत बस प्रवास योजना :

अहिल्याबाई होळकर मोफत एस. टी. पास योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली. विद्यार्थिनींना मोफत प्रवास सवलत देण्यासाठी १९९६-९७ पासून राज्यात ही योजना राबविण्यात आली आहे. या योजनेतंर्गत ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना त्यांच्या गावात माध्यमिक शाळा उपलब्ध नसल्यास शाळेत उपस्थित राहण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात येते. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना शाळेत जाण्याकरिता एस. टी. ने मोफत प्रवासासाठी अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना सुरू करण्यात आली..

स्वरूप :

१) ही सवलत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी अनुज्ञेय असेल.

२) ग्रामीण भागातील स्थानिक ठिकाणी माध्यमिक शिक्षणाची सोय असल्यास दुसऱ्या गावी अथवा शहरात जाऊन माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना ही सवलत अनुज्ञेय राहणार नाही.

३) शाळेच्या मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थिनींची तपशीलवार यादी राज्य परिवहन महामंडळाच्या आगारप्रमुखांना पाठवावी.

४) मुख्याध्यापकांमार्फत यादी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थिनीस संबंधित आगार प्रमुखांमार्फत तिमाही पास मोफत उपलब्ध करून देण्यात येतील.

५) संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी दर महिन्यास विद्यार्थिनींची किमान उपस्थिती ७५ टक्के असण्यासंबंधीचे प्रमाणपत्र राज्य परिवहन महामंडळास दयावे, त्याशिवाय पुढील तिमाहीचा पास महामंडळाने देऊ नये.

६) संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक तीन महिन्यांची माहिती शाळांकडून आलेल्या माहितीच्या आधारे एकत्र करून कोषागारामध्ये देयक सादर करावे, राज्य परिवहन महामंडळास चेक अथवा डिमांड ड्राफ्टने रकमेची प्रतिपूर्ती करावी.

७) शालेय विद्यार्थ्यांना २/३ (दोन तृतीयांश) दरात प्रवास करण्याची सध्या अस्तित्वात असणारी सवलत महामंडळाकडून पुढे चालू ठेवण्यात आलेली आहे.

म्हणजेच ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींच्या संदर्भात उर्वरित १/३ (एक तृतीयांश) खर्चाची प्रतिपूर्ती शासनाकडून महामंडळास करण्यात येईल.

Scroll to Top