महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक १४ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करू हा निर्णय घेतला आहे कि …,
प्रस्तावना
विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, जन्म व मृत्यू नोंदी दाखला, सेवा पुस्तक, विविध परीक्षांची आवेदन पत्रे इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये आईचे नाव वेगळे स्तंभामध्ये दर्शविण्यात येते. तथापि, महिलांना पुरुषाबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी तसेच समाजामध्ये महिला प्रति सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच एकल पालक महिला यांची संतती (अनौरस संतती) यांना देखील समाजामध्ये ताठ मानाने जगण्यासाठी शासकीय दस्तऐवजांमध्ये उमेदवारांचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय: –
1. खालील शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय दिनांक 01 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहील.
1. जन्म दाखला
2. शाळा प्रवेश आवेदन पत्र
3. सर्व शैक्षणिक कागदपत्रे
4. जमिनीचा सातबारा. प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे
5. शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक
6. सर्व शासकीय /निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिप मध्ये(वेतन चिठ्ठी)
7. शिधापत्रिका रेशन कार्ड
8. मृत्यू दाखला
तथापि, सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्ममृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचार विनिमय करावा. तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्ममृत्यू नोंदवहीत बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंद करण्यात यावी.
2. विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाह नंतरचे म्हणजेच तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी. तसेच स्त्रीला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यात येत आहे.
अनाथ व तत्सम अपवादात्मक प्रकरणी मुलांच्या जन्म/मृत्यू दाखल्यात नोंद घेणेबाबत सूट देण्यात येत आहे.
3. याबाबत नमूद करण्यात येते की, खालील शासन निर्णयात आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभात नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अ) शासन निर्णय, महिला व बालकल्याण विभाग, दिनांक 30.11.1999 अन्वये, शाळा, महाविद्यालये, रुग्णालय, जन्म मृत्यू नोंदणी, शिधा वाटप पत्रिका, रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी, लोकसेवा आयोगाच्या परीक्षा इत्यादी बाबतच्या आवेदन पत्रावर तसेच अन्य शासकीय/निमशासकीय कागदपत्रावर/अभिलेखावर वडिलांच्या नावाचा स्तंभ असतो आणि त्यात संबंधिताच्या वडिलांच्या नावाच्या स्तंभाबरोबरच संबंधित आईच्या नावाचाही स्तंभ ठेवण्यात यावा आणि त्यामध्ये संबंधिताच्या वडिलांच्या नावाबरोबर त्याच्या आईचेही नाव नमूद करण्याचे बंधनकारक करण्यात येत आहे.
आ) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, दिनांक 05.02.2000 अन्वये, प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली मध्ये विद्यार्थ्याचे नाव दाखल करताना दाखल खारीज नोंदवही मध्ये/जनरल रजिस्टर मध्ये/दत्ता ब मध्ये विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव लिहिल्यानंतर त्या शेजारी एका रकान्यात विद्यार्थ्यांच्या आईच्या नावाची नोंद करण्यात यावी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला देताना त्यामध्ये विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव लिहिल्यानंतर त्याखाली विद्यार्थ्यांच्या आईचे नाव लिहिण्यात यावे.
ई) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, दिनांक 24.02.2010 अन्वये, घटस्फोटीत पत्नी, पत्नी व आई वडिलांचा घटस्फोट झाला असेल, अशाप्रकरणी त्यांना असणाऱ्या आपत्याची कस्टडी न्यायालयाने त्यांच्या आईकडे दिली असेल, अशा घटस्फोटीत आईने/महिलेने अपत्याच्या नावापुढे त्याच्या वडीलाच्या नावाऐवजी त्याच्या आईचे नाव लावावे, अशी विनंती केल्यास विहित करण्यात आलेल्या अटीच्या अधीन राहून नावात बदल करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
वरील शासन निर्णयात आईच्या नावाचा उल्लेख वेगळ्या स्तंभात दर्शविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, आता सदर शासन निर्णयात सुधारणा करून मा. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडीलाचे नाव तदनंतर आडनाव अशा स्वरूपात लावणे बंधनकारक करण्याच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय विभागाने आवश्यक ते कार्यवाही करावी.
4. मा. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार ज्या विभागाच्या कागदपत्राच्या नमुन्यात बदल करणे आवश्यक आहे त्या प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिनियम/नियम इत्यादी मध्ये सुधारणा करण्यासाठी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करावा व तदनंतर आवश्यक ती प्रक्रिया करण्यात यावी.
5. सदर शासन निर्णय मा. मंत्रिमंडळाने दिनांक 11 मार्च 2024 रोजी च्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
6. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202403141942537230 असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
7. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,