राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शाळांच्या भौतिक, शैक्षणिक व विद्यार्थी विकासाच्या संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी व शालेय कामकाजामध्ये पालकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी दिनांक 22 मे 2000 च्या शासन निर्णयान्वये प्रत्येक मान्यताप्राप्त शाळेत पालक शिक्षक संघाची स्थापना करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मार्गदर्शक तत्वे
पुढील विहित मार्गदर्शक तत्वे राज्यातील राज्य शासनाने मान्यता दिलेल्या कायम अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा तसेच राज्यातील कार्यरत असलेल्या अन्य शिक्षण मंडळाशी (CBSE,ICSE,IB) च लग्न असलेल्या शाळांना शासन आदेशाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.
१) शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक हे पालक-शिक्षक संघाचे सभासद असतील.
२) पालक-शिक्षक संघाची कर्तव्ये खालीलप्रमाणे असतील.
(अ) नियोजनाप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण होईल हे पाहणे.
(ब) अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य त्या उपाययोजना सुचविणे.
(क) अभ्यासाची पूरक असलेल्या अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यास शाळांना साहाय्य करणे.
(ड) सहशालेय उपक्रम यांना मान्यता देणे.
(इ) शाळेतील शैक्षणिक शुल्क, सत्र फी व सहशालेय उपक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कासंबंधी माहिती घेऊन पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समिती पुढे त्यांचे म्हणणे मांडणे.
३) पालक-शिक्षक संघाचा मूळ उद्देश विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या सोडविणे हा आहे. पालक शिक्षक संघाने शाळेचे दैनंदिन कामकाज व प्रशासनात लक्ष घालणे अपेक्षित नाही.
४) शुल्क निश्चितीच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे. यासंदर्भात पालक-शिक्षक संघाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. प्रत्येक शाळेमध्ये पालक-शिक्षक संघ स्थापन करणे अनिवार्य आहे.
पालक-शिक्षक संघाची रचना व कार्यपद्धती पुढीलप्रमाणे
अ) शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून ३० दिवसांच्या आत पालक-शिक्षक संघाची स्थापना करावी.
ब) शाळेतील प्रत्येक विदयार्थ्यांचे पालक हे पालक-शिक्षक संघाचे सभासद असतील.
क) पालक शिक्षक संघाची स्थापना झाल्यानंतर पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची निवड शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पालक-शिक्षक संघाच्या सर्वसाधारण सभेने करावी. या बैठकीसाठी सर्वसाधारण सभेचा एकूण सभासदांपैकी किमान ५० टक्के सभासद उपस्थित असणे अनिवार्य आहे. या सभेमध्ये जर जास्त उमेदवार कार्यकारी समितीस प्रतिनिधित्वासाठी उत्सुक असतील तर सोडत पद्धतीने उमेदवाराची निवड शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून दोन आठवड्यांत करण्यात यावी. पारदर्शी पद्धतीने दोन आठवड्यांत कार्यकारी समिती गठीत करण्यात येईल.त्यासाठी घ्यावयाच्या बैठकीत सूचना सर्व संबंधितांना मुख्याध्यापकांकडून पत्रकाद्वारे एक आठवडा अगोदर देण्यात येईल.
ड) पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची रचना पुढीलप्रमाणे राहील.
- अध्यक्ष. -प्राचार्य/मुख्याध्यापक
- उपाध्यक्ष -पालकांमधून एक
- सचिव.- शिक्षकांमधून एक
- सहसचिव (२).- पालकांमधून एक व शिक्षकांमधून एक
- सदस्य.. ..- प्रत्येक इयत्तेतील एक शिक्षक
- प्रत्येक तुकडीसाठी एक पालक
- (जेवढ्या तुकड्या तेवढे पालकसदस्य)
इ) कार्यकारिणी समिती मधील सदस्यांमध्ये ५०% महिला सदस्य असतील.
फ) पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांच्या नावांची यादी शाळेच्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल.
ग) प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून पालक-शिक्षक संघाची स्थापना केल्यानंतर १५ दिवसांच्या आत सभासदांच्या नावांची यादी व कार्यकारी समितीच्या सदस्यांची यादी संबंधित प्रशासनास सादर करण्यात येईल.
ह) पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची मुदत दोन वर्षे राहील. कोणत्याही पालकांस एकदा पदाधिकारी अथवा कार्यकारी समितीचा सदस्य झाल्यानंतर त्यानंतरच्या पाच वर्षांत पदाधिकारी अथवा कार्यकारी समितीचा सदस्य होता येणार नाही.
य) कार्यकारी समितीची बैठक दोन महिन्यांतून किमान एकदा घेण्यात यावी.
२) सर्व बैठकांची सूचना पत्रकाद्वारे विषयपत्रिकासह सर्व सभासदांना आगाऊ पाठविण्यात येईल.
ल) शाळेकडून पालक-विद्यार्थ्यांकरिता दर्शनी भागात एक स्वतंत्र सूचना पेटी उपलब्ध असेल.
व) पालक-शिक्षक संघाबाबतची सर्व परिपत्रके, शासन निर्णय, उच्च न्यायालयाचे निर्णय, सूचना तसेच कार्यकारिणीतील सदस्यांची नावे, संपर्क क्रमांक, कार्यकारिणी समितीच्या बैठकांचे इतिवृत्त इत्यादी सर्व कागदपत्रे सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येतील.
श) पालक-शिक्षक संघाच्या वर्षातून दोन बैठका घेण्यात येतील. प्रत्येक बैठकीत ६ महिन्यांपेक्षा अधिक अंतर असू नये. सदर बैठकीची कार्यसूची पालक-शिक्षक संघाच्या सदस्यांना किमान १५ दिवस अगोदर हस्तदेय स्वरूपात वितरित करण्यात येईल. पालक-शिक्षक संघापुढे शैक्षणिक शुल्क निश्चितीचा विषय प्रथम चर्चेसाठी ठेवण्यात येईल व त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या सूचनांची नोंद कार्यकारी समिती बैठकी करण्यात घेईल.
पालक शिक्षक संघ शासन निर्णय(PDF) :पालक शिक्षक संघ